नगर – करोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी 10 हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता द्या. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर स्पेशल आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भाकपचे राज्य सहसचिव कॉ.सुभाष लांडे, शहर सचिव भैरवनाथ वाकळे, जिल्हा सहसचिव ऍड.सुधीर टोकेकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक शिरसाठ, तुषार सोनवणे, विकास गेरंगे आदी उपस्थित होते. सर्वत्र आरोग्यव्यवस्था काम करत असूनही सामान्य माणूस या संकटाने कोलमडून पडला आहे. करोना पूर्वी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था आधीच मोडकळीस आलेली असताना, करोनाचे संकट आले.