यंदाच्या हंगामातील पहिलाच मोठा पाऊस
पुणे – मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुणेकरांना शनिवारी सुखद अनुभव देत पावसाने तासभर हजेरी लावली. दरम्यान, यंदाच्या हंगामात हा पहिलाच मोठा पाऊस ठरला आहे. सायंकाळी 8.30 पर्यंत या पावसाची नोंद 36 मिमी झाली आहे.
नागपंचमीच्या सायंकाळी बरसलेल्या श्रावणसरींनी पुणेकर सुखावले असले, तरी पावसामुळे काही जणांची तारांबळ उडाली. बहुतांश रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. राज्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कमी झाला होता.
पुण्यातही अनेक दिवसापासून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. झारखंड आणि आसपासच्या भागात तयार झालेली चक्रीय स्थिती तसेच हिमालयाच्या पायथ्यापासून खाली आलेला मान्सूनचा “ट्रफ’ यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. रविवारीदेखील (दि. 26) हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुण्यातील पावसाने यंदा सरासरी ओलांडली असून, शनिवारी सायंकाळपर्यंत सरासरीपेक्षा 19 मिमी जास्त म्हणजेच एकूण 303.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.