गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील टिपागड परिसरातील दुर्गम भागात नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेले 9 आयईडी बॉम्ब, 3 क्लेमोर व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत करत नष्ट करत मोठी कारवाई केली आहे.
गडचिरोलीतील टिपागड परिसरात स्फोटके आणि मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी सी-60 ची एक तुकडी आणि सीआरपीएफची एक QAT यांच्यासह 2 BDDS पथके तैनात करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षल्यांची शोध मोहीम राबवत असताना पोलिसांना रविवार 5 मे रोजी टिपागड परिसरात एक पिन पॉईंट स्थान उघडकीस आले होते. त्याठिकाणी डोंगरावर ही स्फोटके आणि त्यावर माती टाकण्यात आली होती.
त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब 02 BDDS संघांसह सी-60 ची एक तुकडी आणि सीआरपीएफची एक QAT असलेली एक टीम डंपचा शोध घेण्यासाठी आणि गरज पडल्यास ती नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आली.
त्यानुसार, आज, सोमवार 6 मे रोजी त्यांना स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर आणि डिटोनेटर सापडले आणि स्फोटकांनी भरलेले 3 क्लेमोर पाईप्स आणि श्रापनेल्स देखील सापडले. उर्वरित 3 क्लेमोअर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते.
पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट सापडले. एकूण 9 आयईडी आणि 3 क्लेमोर पाईप्स बीडीडीएस टीमने घटनास्थळी नष्ट केले.