देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथे वर्षाचे बाराही महिने वारकरी येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न देहू नगर पंचायत प्रशासनाने केला आहे. मात्र या सुविधा अपुऱ्या पडत असून सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याची मागणी होत आहे.
देहूत येणाऱ्या भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह आणि आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. मात्र दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने भाविक खासगी वाहनाने देहूमध्ये येत असतात. मात्र येथे पार्किंगची व्यवस्था नसल्याने भाविक जागा मिळेल त्याठिकाणी वाहन पार्किंग करतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच येथील वाहनांवर वाहतूक पोलिसांकडूनही दंडात्मक कारवाई केली जाते.
सायंकाळीच्यावेळी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामध्ये वाढ होते. तसेच काही दुकानदारही पदपथावर अतिक्रमण करतात. त्यामुळे भाविकांना रस्त्यावरून चालावे लागते. यापूर्वीही प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र प्रशासनाची पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमण होते.