पुणे – ज्या नागरिकांनी २०१२ पूर्वी आधार कार्ड काढलेले आहे, परंतु मागील १० वर्षामध्ये अद्ययावत (अपडेट) केलेले नाही, अशा नागरिकांनी त्यांचे आधार अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये आधार अपडेटची मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून वर्षभरात सुमारे ८० हजार नागरिकांनी आधार अद्ययावत केले आहे. अजूनही पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील सुमारे २९ लाख नागरिकांचा आधार तपशील अद्ययावत करणे बाकी आहे.
केंद्र आणि राज्य सरकारी योजना, लाभ यांसह रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, मोबाइलचे सीमकार्ड घेणे किंवा अद्ययावत करणे, बॅंक खाते उघडण्यापासून सर्व ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधारची मागणी केली जाते. आधारवरील लिंग, नाव, पत्ता, छायाचित्र आदींमध्ये बदल झाल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असते. मात्र, दर दहा वर्षांनी आधार अद्ययावत करावे लागते, ही बाब नागरिकांना अद्याप माहिती नाही.
नागरिक पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करून आधारवरील तपशीलात बदल करू शकतात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया) अपडेट डॉक्युमेंट नावाची नवी सुविधा तयार केली असून माय आधार या संकेतस्थळावर ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावरही माहिती अद्ययावत करता येते. मात्र, आधार अद्ययावतीकरण ऐच्छिक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
देशातील ४० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून त्यापैकी पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पासून या मोहिमेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आधार अद्ययावतीकरणाला गती देण्यात असून मागील वर्षभरात आतापर्यंत सुमारे ८० हजार नागरिकांनी आधार अपडेट केले आहे. अजूनही २९ लाख नागरिकांचे आधार अपडेट करणे बाकी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आॅनलाइनचीही सुविधा
ज्या नागरिकांनी दहा वर्षांपूर्वी आधार काढले आहे. अशा नागरिकांनी पत्ता, मोबाइल क्रमांक, तसेच बोटांचे ठसे आदी अद्ययावत करून घ्यायचे आहे. शहरातील आधार सेवा केंद्र, टपाल कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी आधार अद्ययावत करता येईल. माय आधार संकेतस्थळावरही ऑनलाइन पद्धतीने अद्ययावत करता येत आहे.