पिंपरी – ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक चालक मालक फेडरेशनच्या आंदोलनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. देशभरात सर्व सुविधायुक्त ड्रायवर भवन निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हे आंदोलनाचे यश असून, आमच्या इतरही मागण्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, असे ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.
हिट अँड रन कायद्याच्या विरोधात व इतर विविध मागण्यांसाठी १ व २ जानेवारीला देशभरातील २५ कोटी वाहन चालकांनी संप करून ३ जानेवारी रोजी दिल्लीत सर्व देशभरातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत जंतर मंतर येथे आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ट्रक, टॅक्सी चालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ताणामुळे अपघाताला सामोरे जावे लागते. प्रवासा दरम्यान त्यांची सोय व्हावी आणि आराम मिळावा यासाठी ड्रायवर भवन निर्माण करणार आहे. तयात स्वच्छतागृह, आरामाची, जेवणाची सुविधा निर्माण केली जाणार असल्याचे सांगितले.
देशभरातील ट्रक, टॅक्सी चालकांच्या एकजुटीमुळे केंद्र सरकारला लवचिक भूमिका घ्यावी लागली. सध्या भवन उभारण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. आता इतर मागण्यांबाबत त्वरीत सकारात्मक तोडगा काढणे आवश्यक आहे. इतर मागण्यांसाठी दिल्ली येथील आमचा लढा सुरूच राहणार आहे, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.