पिंपळे गुरव – शहरातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा व रसिकांना अभिनयाचा आनंद लुटता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने पिंपळे गुरव येथे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारले. येथील निळू फुले नाट्यगृह चक्क मार्च अखेरपर्यंत हाऊसफुल्ल झाले आहे. शाळांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यासाठी मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळा येथील नाट्यगृहात धाव घेत आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार मार्च अखेरपर्यंतच्या तारखा बुकिंग झाल्या आहेत.
सोमवार ते गुरुवार देखील मोठ्या प्रमाणात शाळांनी बुकिंग केलेले आहे. मोजकेच सणवारांचे दिवस सोडले तर नाट्यगृह बुक झाल्याचे येथील व्यवस्थापक दिगंबर वाघेरे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.नोव्हेंबर महिन्यापासून शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम येथे सुरू आहेत. अनेक शाळा सरावासाठी देखील बुकिंग करीत आहेत. येथे नाटकांचे प्रयोग कमी मात्र, बाराही महिने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे एकूण चार नाट्यगृहे आहेत. इतर नाट्यगृहांपेक्षा येथील नाट्यगृहाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर देखील अव्वाच्या सव्वा असूनही सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.
1 नोव्हेंबर ते 31 जानेवारीपर्यंत तब्बल 10 लाख 19 हजार 582 रुपये (अंदाजे उत्पन्न) महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. नाट्यगृहात सुसज्ज रंगमंच, पार्किंग सोय, विद्युत व्यवस्था, वातानुकूलित हॉल व इतर सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज, असे प्रेक्षागृह रसिकांना सतत भुरळ घालत आहे. येथील नाट्यगृह पिंपळे गुरव पुरते मर्यादित न राहता औंध, बाणेर, पाषाण, चतुशृंगी, वाकड, सांगवी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, कासारवाडी, दापोडी आदी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालये सुशिक्षित आणि सांस्कृतिक वसा लागलेली उपनगरे असल्याने येथील निळू फुले नाट्यगृहाला अधिक पसंती देत आहेत. वर्षभरात नाटक, मराठी सिनेमांचे पोस्टर लॉन्चिंग, सहकारी बँका, पतसंस्था यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, पारितोषिक वितरण समारंभही येथे होतात.
सध्या जुन्या दराने नाट्यगृह उपलब्ध
नुकत्याच पार पडलेल्या नाट्य संमेलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीअंती कलाकार क्षेत्रातील कलाकारांनी दरवाढ कमी करण्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याच क्षणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दरवाढ कमी करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून आयुक्तांच्या आदेशानुसार जुन्या दरपत्रकानुसार नाट्यगृहाचे भाडे स्वीकारण्यात येत आहे.
नाट्यगृहातील व्यवस्था
तळमजल्यावर नाट्यगृह, पहिल्या मजल्यावर बाल्कनी, व्यवस्थापकीय कार्यालय तर दुसर्या मजल्यावर श्रीपती गांगार्डे बहुउद्देशीय हॉल उपलब्ध आहे. नाट्यगृहात 388 तर बाल्कनीमध्ये 168 खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. लिफ्टची सोय, महापालिकेचे 1 व्यवस्थापक, 1 क्लार्क, 5 कर्मचारी कार्यरत आहेत. 14 खासगी कर्मचारी व 6 खासगी सुरक्षारक्षक आहेत. पार्किंग सोय उपलब्ध आहे. याठिकाणी आधुनिक सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
नाट्यगृहातील भाडे पुढीलप्रमाणे
दिवसभराचे भाडे : 62,835 रुपये
दहा तास : 42,185 रुपये
बारा तास : 50,681 रुपये
आठ तास : 33,453 रुपये
पाच तास : 21,181 रुपये
तीन तास : 10,561 रुपये
अधिक खर्च
लॅपटॉप : 100 रुपये
व्हीआयपी रूम : 250 रुपये
प्रोजेक्टर : 450 रुपये
रंगीत हॅलोजन प्रत्येकी : 50 रुपये
पडदे लाल, निळा प्रत्येकी : 50 रुपये
नोव्हेंबर ते मार्च अखेर या पाच महिन्यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनामुळे शाळा आणि महाविद्यालय नाट्यगृहाच्या तारखा बुकिंग करीत असतात. दुसर्या मजल्यावर येथे बहुउद्देशीय सभागृह देखील आहे. यात दोनशे लोक बसू शकतील एवढी आसन क्षमता असून तासाला येथे 1,215 रुपये भाडे आकारले जाते. यावर्षी मात्र वर्षाच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. येथे कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस व वैयक्तिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही.
– दिगंबर वाघेरे, नाट्यगृह व्यवस्थापक.