दिल्ली, ता. 22 – सूर्यकिरण शक्तीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करणारी सूर्य शेगडी भारतात निर्माण झाल्यानंतर इजिप्त व इस्रायल यांना त्यासंबंधी आकर्षण वाटत आहे असे विज्ञान-औद्योगिक मंडळाचे प्रमुख श्री. भाटनागर यांनी निवेदन केले.
नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या जागेत सूर्यकिरण शक्ती व वायुशक्तीचा उपयोग कसा करून घेणे शक्य आहे याबाबत एक मेळावा भरवण्यात आला आहे. इजिप्शीयन सरकारला सूर्य शेगडीच्या बनावटीच्या तपशील मोफत कळविण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.
पोस्ट कार्डांची किंमत कमी होणार नाही
कुर्नूल – पोस्ट कार्डाची किंमत मुळीच कमी करण्यात येणार नाही, असे भारताचे दळणवळण मंत्री श्री. जगजीवनराम यांनी निवेदन केले. ते म्हणाले, कार्डांची किंमत कमी करून फक्त व्यापारी संस्थानाच फायदा होईल. गरीब माणूस वर्षातून फार तर डझनभर कार्डेच वापरतो. पोस्ट कार्डाचेबाबत सरकारला दरवर्षी 1 कोटी 15 लक्ष तोटा होत असून 1 कोटी वृत्तपत्र पोस्ट सवलतीने होतो. 100 वर्षांपूर्वीच वृत्तपत्रांचे पोस्ट दर ठरले असून त्यात अद्याप बदल केलेला नाही.
एका नर्सने केलेले धाडस!
निपाणी – आज सकाळी पुणा-बंगलोर रोडवर शहरापासून एक फर्लांग अंतराचे आत भररस्त्यावर येथील एका मोठ्या दवाखान्यातील नर्सने आपली चेष्टा करणाऱ्या एका श्रीमान टोळक्यास आपल्या पादत्राने बडविले अशी खळबळजनक बातमी पसरली.
गावात याबाबत अधिक तपास करिता असे समजून आले की सदर नर्स सायकलवरून जात येत असता शहरातील एक श्रीमंत तरूण त्रिकूट तिच्या जाणे येणेवर पाळत ठेवून, तिला उद्देशून अश्लिल शब्द उच्चारित असत.
या प्रकरणाचा त्वेश येऊन आज सकाळी या नर्सने, या त्रिकुटाने तिची चेष्टा करीताच तिने सायकलवरून उतरून चेष्टा करणाऱ्या तरुणास पकडून पादत्राने त्याची शोभा केली. आपल्या मित्राची अशी शोभा झालेली पाहून त्याचे सोबती पसार झाले.