नवी दिल्ली – देशातील प्रत्येक नागरिकाला करोनाविरोधी लस देण्यासाठी सरकारने प्रत्येकी 6-7 डॉलर राखीव ठेवले आहेत. ही लस देण्यासाठी प्रत्येक नागरिकामागे 2 डॉलरचा खर्च गृहीत धरला आहे, अशी माहिती मिळते आहे.
सरकारने लसीकरणासाठी 500 अब्ज रुपये (7 अब्ज डॉलर)चा निधी राखीव ठेवला असून योग्य वेळी या निधीचा उपयोग लसीकरणासाठी केला जाईल, अशी माहिती मिळते आहे. देशाची लोकसंख्या 1 अब्ज 30 कोटी गृहीत धरली तर प्रत्येक नागरिकामागे केंद्र सरकारने 6-7 डॉलर राखून ठेवले आहेत. या निधीची तरतूद चालू आर्थिक वर्षात म्हणजे 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे आणि त्यापुढील काळातही लसीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे केंद्र सरकारचे नियोजन आहे, अशी माहिती मिळते आहे. मात्र, ही माहिती अधिकृत नसल्याने संबंधित सूत्राची ओळख उघड करता येऊ शकलेली नाही.
देशातील प्रत्येक नागरिकाला लसीची 2 इंजेक्शन देण्यासाठी प्रत्येक इंजेक्शनमागे 2 डॉलरचा खर्च गृहीत धरला गेलेला आहे. उर्वरित 2 ते 3 डॉलरचा खर्च हा लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक आणि साठवणुकीसाठी केला जाईल. लसीकरणासाठी कार्यरत असलेल्या कृती गटाने केलेल्या शिफारसींच्या आधारे ही तरतूद केली गेलेली आहे, असे समजते आहे. मात्र, अर्थमंत्रालयातील सूत्रांकडून या वृत्ताचे समर्थन होऊ शकलेले नाही.