चंडीगढ – कॉंग्रेसचे पंजाब प्रभारी असणारे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत यांनी माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना राफेल लढाऊ विमानाची उपमा दिली. आमदार असणाऱ्या सिद्धू यांच्यावर कॉंग्रेसकडून मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
पंजाबमध्ये 2017 या वर्षी कॉंग्रेसची सत्ता आल्यानंतर सिद्धू यांना मंत्री बनवण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याबरोबरचे मतभेद विकोपाला गेल्याने त्यांनी मागील वर्षी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर ते कॉंग्रेसच्या कामकाजापासून काहीसे दूरच होते. मात्र, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि अमरिंदर यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत सिद्धू सहभागी झाले.
त्यानंतर पंजाब विधानसभेत अलिकडेच केंद्रीय कृषी कायदे नाकारणारी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यावेळी बऱ्याच कालावधीनंतर विधानसभेत उपस्थित राहून सिद्धू यांनी प्रभावी भाषण केले. त्याचे कौतुक अमरिंदर यांनीही केले.
अशातच रावत यांनी सिद्धू यांची मुक्तकंठाने प्रशंसा करून कॉंग्रेस पक्षाकडून त्यांना महत्व दिले जात असल्याचे अधोरेखित केले. केवळ पंजाबमध्येच नव्हे; तर राष्ट्रीय पातळीवर सिद्धू अतिशय उपयुक्त व्यक्ती आहेत. ते कॉंग्रेसच्या ताफ्यातील राफेल आहेत. त्यांना योग्यवेळी जबाबदारी दिली जाईल, असे त्यांनी म्हटले.
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी सव्वावर्षाचा कालावधीच बाकी आहे. त्यामुळे रावत यांचे सिद्धू यांच्याविषयीचे वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.