शकिला व समीर मुलाणीला अटक; ऍट्रॉसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
नागठाणे – देशमुखनगर, ता. सातारा येथील शकिला गुलाब मुलाणी हिच्या अवैध दारू विक्री अड्ड्यावर गुरुवारी छापा टाकून बोरगाव पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिचा मुलगा समीर गुलाब मुलाणी याने धिंगाणा घाला. त्याने एका ग्रामस्थावर जीवघेणा हल्ला करत असताना त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना अश्लील भाषेत व जातिवाचक शिवीगाळ केली. समीर मुलाणीला काबूत आणण्यासाठी बोरगाव पोलिसांना अखेर सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या टीमची मदत घ्यावी लागली.
बोरगाव पोलिसांनी शकिला मुलाणी हिच्याविरोधात अवैध दारू विक्री, पुरावा नष्ट करणे तर समीर मुलाणी याच्याविरोधात ऍट्रॉसिटी, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकीसह 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशमुखनगर येथील शकिला मुलाणी ही ड्राय डेला चोरटी दारू विकत असल्याची माहिती सपोनि चंद्रकांत माळी यांना समजली. त्यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास शकिलाच्या घरावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच शकिलाने दारूच्या बाटल्या फोडायला सुरुवात केली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत देशी-विदेशी दारूच्या चार हजार रुपये किमतीच्या बाटल्या जप्त केल्या.
पोलिसांनी शकिला बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. आईला पोलिसांनी पकडल्याचे समजताच समीर मुलाणीने देशमुखनगर येथे धिंगाणा घातला. त्याची माहिती मिळाल्यावर सपोनि चंद्रकांत माळी, पोलीस नाईक राजू शिखरे व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देशमुखनगर येथे धाव घेतली. तोपर्यंत समीरने देशमुखनगर-टिटवेवाडी रस्त्याने निघालेल्या नवनाथ बाळू माने याला रोखून मारहाण केली. त्याचा गळा आवळण्यास सुरुवात केली. त्याच वेळी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी मोठ्या मुश्किलीने नवनाथला समीरच्या तावडीतून सोडवले. मात्र, समीर आणखी आक्रमक झाला. त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ केली.
चंद्रकांत माळी व कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करूनही तो आवरत नसल्याचे पाहून माळी यांनी या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून शेख यांनी रॅपिड ऍक्शन फोर्ससह देशमुखनगरकडे धाव घेत समीरला ताब्यात घेतले.