बंगळुरू – असंख्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात जेडीएस पक्षाने विद्यमान खासदार व एनडीए आघाडीचे हसन मतदार संघातील उमेदवार प्रज्वल रेवण्णा ( MP Prajwal Revanna) यांना आज अखेर निलंबीत केले आहे. त्यांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणाच्या तब्बल २ हजार ९७३ व्हिडीओ एका पेन ड्राईव्हद्वारे उघड झाल्यानंतर त्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा आदेश कर्नाटक सरकारने दिला होता. त्यानंतर मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी रेवण्णा जर्मनीला पळून गेले आहेत.
एनडीए आघाडीला फटका बसण्याची शक्यता –
या प्रकरणात कॉंग्रेसने राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण खूपच गाजले आहे. कर्नाटकात अजून दुसऱ्या टप्प्याचे मतदान बाकी असल्याने त्याचा एनडीए आघाडीला फटका बसण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू असलेले रेवण्णा यांना पक्षातून आज निलंबीत करण्यात आले. कर्नाटकात भाजप-जेडीएसची युती आहे.
घरातच काम करणाऱ्या एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली-
ऐन निवडणुकीच्या काळातच त्यांचे हे सेक्स व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या विरोधात त्यांच्या घरातच काम करणाऱ्या एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. रेवण्णा यांच्या हसन मतदार संघात २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रेवण्णा विदेशात पळून गेले आहेत.
सदर महिलेने रेवण्णा यांचे वडिल एचडी रेवण्णा यांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. एचडी रेवण्णा हेही होलेनरसिंहपुर मतदार संघातील जेडीएस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी म्हटले आहे की हे व्हायरल झालेले व्हिडीओ चारपाच वर्ष जूने असून ते उकरून काढून आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे असा आरोप त्यांनी केला. प्रज्वल रेवण्णा यांनी मात्र हे व्हिडीओच बनावट असल्याचा बनाव केला आहे.
एसआयटी मार्फत चौकशी –
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्याच्या महिला आयोगाने याची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने एसआयटी मार्फत चौकशीचा आदेश जारी केला आहे. भाजपचे होलेनरसिंहपुर मतदार संघातील माजी उमेदवार देवराजे गोैडा यांनी या प्रकरणात डिसेंबर मध्येच भाजप नेत्यांना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांच्या बाबत माहिती दिली होती. पण तरीही पंतप्रधानांनी त्यांचा प्रचार केला त्यामुळे या प्रकरणाकडे पंतप्रधानांनी डोळेझाक केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. महिलांना या व्हिडीओ द्वारे ब्लॅक मेल करून प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडिल त्यांचे लैंगिक शोषण करीत असत अशी माहिती आता पुढे येत आहे.