विधानसभा निवडणुकीसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण व डॉ. अतुल भोसले यांचे उमेदवारी अर्ज दाखल
कराड – कराड दक्षिण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून कराड दक्षिणेत भव्य शक्तीप्रदर्शन करत भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी सुरुवातीला येथील तहसील कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. तेव्हा या परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
त्यानंतर डॉ. भोसले यांनी दत्त मंदिरात जाऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. तसेच त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तिथून सभास्थळी जाण्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने त्यांच्या रॅलीस प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या टेम्पोमध्ये अतुल भोसले उभे राहिले. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक पुढे मार्गस्थ होत होती. या रॅलीत अतुल भोसले यांचा विजय असो, अबकी बार अतुलबाबा आमदार, अशा पद्धतीच्या घोषणा युवक कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या.
यावेळी श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, ना. शेखर चरेगावकर, मदनराव मोहिते, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भीमरावदादा पाटील, ऍड. भरत पाटील, डॉ. सुरेश भोसले, सुनील पाटील, कराडच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
दत्त चौकातून सुरू झालेली मिरवणूक आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक मार्गे कन्याशाळा येथे पोहोचली. त्यानंतर याठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी मतदार संघातील मतदार व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.