पिंपरी – अपंग व्यक्तींना एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करत असताना स्मार्ट कार्ड न वापरता केंद्र सरकारने दिलेले युडीआयडी कार्ड (वैश्विक ओळखपत्र ) वापरण्याबाबत एसटी महामंडळाकडून परिपत्र जारी करण्यात आले असून या पूर्वी मागणी करण्यात येत असलेले अपंगांसाठी एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड अखेर बंद करण्यात आले आहे.
प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त यांच्याकडे एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेले स्मार्ट कार्ड रद्द करण्याबाबतची मागणी केली होती.
या मागणीच्या आधारे अखेर एसटी महामंडळाने कार्ड स्मार्ट कार्ड बंद केल्याचे अपंग कल्याण आयुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणी दरम्यान सांगितले. त्यामुळे यापुढे अपंग व्यक्तींना एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करत असताना स्मार्ट कार्ड न वापरता केंद्र सरकारने दिलेले युडीआयडी कार्ड (वैश्विक ओळखपत्र )वापरण्याबाबत एसटी महामंडळाकडून परिपत्र जारी करण्यात आले आहे.
अनेक वेळा एसटी महामंडळाचे अधिकारी, अपंग कल्याण आयुक्त व तक्रारदार राजेंद्र वाकचौरे यांची ऑनलाइन सुनावणी होऊन २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी एसटी महामंडळाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारा दिव्यांग लाभार्थ्यास विना वातानुकूलित शयन असणे तसेच शिवनेरी बसमध्ये सवलत अनुद्येय करणेबाबत गृह विभागास प्रस्ताव पुन्हा सादर करावा, असे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अपंगाची प्रवासादरम्यान होणारी फरफट थांबणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व अपंग प्रवाशांना याचा फायदा होणार आहे असे निकाला नंतर राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले.