सांगवी – जुनी सांगवीतील कुंभारवाड्यानजीक आरोग्य कर्मचारीच तब्बल दोन ट्रक भरून कचरा पेटवून देऊन सांगवीकरांच्या आरोग्याशी खेळत आहे. माजी महापौरांसह सर्वच माजी नगरसेवकांना याचा साधा थांगपत्ताही नाही. पेटवलेल्या कचऱ्याची आग विझविण्यासाठी दरवेळी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत आहे. जवळच कचरा डम्पिंग करण्याची सोय असतानाही आरोग्य विभागामार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पवना नदीकाठी टाकून का पेटवून देण्यात येतो, याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.
जुनी सांगवीतील बाबुराव ढोरे भवनसमोर कुंभारवाड्या नजीक स्वच्छतागृहाशेजारी नेहमीच कचऱ्याचे ढीग दिसतात. अचानक ट्रक दोन ट्रक भरतील एवढा कचरा येथे नेमके कोण टाकते, याचे कोडे नागरिकांनाही उलगडत नव्हते. आरोग्य कर्मचारीच येथे कचरा साठवून दुपारनंतर तो पेटवून देत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक धुराचे लोट दिसले. धूर एवढ्या मोठ्या प्रमाणात होता, की संपूर्ण सांगवीत धूरच धूर पसरला होता. वाहनांना समोरचे काही दिसत नव्हते.
लोकप्रतिनिधी गप्पच?
अगदी हाकेच्या अंतरावर माजी महापौर माई ढोरे यांचे निवासस्थान आहे. तसेच इतर माजी नगरसेवकांची कार्यालयेही जवळच आहेत. हा प्रकार तिसऱ्यांदा होऊनही कोणत्याच लोकप्रतिनिधींच्या हे कसे लक्षात आले नाही, याचे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत माजी महापौर माई ढोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात येथे कचरा टाकणार नाहीत. पवना नदीकाठी साठलेला कचरा हा जवळपास दोन ट्रक असेल. हा कचरा मुद्दाम जाळण्यात येतो. याच ठिकाणी कचरा तिसऱ्यांदा जाळला आहे. मागेही अग्निशमन दलाची गाडी बोलावली होती. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
– राजू सावळे, मनसे शहर उपाध्यक्ष
आम्ही सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि ट्रेनिंग देत असतो. त्यामुळे हा कचरा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाणे अशक्य आहे. तसेच येथे जो कचरा टाकला जातोय तो पुणे महापालिकेका हद्दीतून आणून टाकला जात असल्याची शक्यता आहे. याबाबत आम्ही शोधमोहीम राबवून येथे नेमके कोण कचरा टाकत आहे हे शोधून काढू.
– धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक, सांगवी.