कराड – येथील मुजावर कॉलनीतील घरात झालेल्या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्यासह तीन जण जखमी झाले होते. जखमींपैकी सुलताना शरीफ मुल्ला (वय 33) यांचा बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी सुलताना यांचे पती शरीफ मुबारक मुल्ला (वय 36) यांचाही मृत्यू झाला आहे. दोन दिवसांच्या अंतराने पती- पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील मुजावर कॉलनीत शरीफ मुल्ला यांच्या घरात 25 ऑक्टोबर रोजी सकाळी अचानक स्फोट झाला होता. या स्फोटात त्यांच्या घरासह परिसरातील अन्य पाच घरांसह सहा दुचाकींचेही नुकसान झाले होते. या स्फोटात तीन घरांतील एकूण सात जण जखमी झाले होते. दरम्यान, हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवला आहे.
या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या घरातील दोन लहान मुलांसह त्यांच्या पत्नी सुलताना व नजीकच्या घरातील अन्य तीन- चार जण जखमी झाले होते. या जखमींवर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान बुधवारी शरीफ मुल्ला यांच्या पत्नी सुलताना मुल्ला यांचे उपचारादारम्यान मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून शरीफ मुल्ला यांना जास्त त्रास होऊ लागला. अखेर शुक्रवारी शरीफ मुल्ला यांचेही उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान, दोन दिवसांच्या अंतराने शरीफ मुल्ला व सुलताना मुल्ला या पती- पत्नीचा मृत्यू झाल्याने मुजावर कॉलनीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.