पिंपरी – प्रकाशाचा सण दिवाळी अगदीच उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना पिंपरी चिंचवड शहरातील बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी गर्दीचा उच्चांक गाठलेला आहे. त्यातच घर आणि आंगण सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची रेलचेल असून कागदी, कापडी, बांबू, खणाच्या कापडापासून केलेले आकाशकंदील आकर्षण ठरत आहे. या आकाशकंदिलांवर अतिशय बारीक नक्षीकाम केले असल्याने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
वर्षांतील सर्वात मोठा सण. मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवानिमित्त घर आणि आंगण दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते. त्यासाठी पणत्या, आकाशकंदील, वीजेच्या एलईडी माळा बाजारात दाखल झाल्या आहेत. आकाशकंदिलाच्या लख्ख प्रकाशाने घर उजळून निघते. अंधार दूर करून प्रकाशाचे चैतन्य निर्माण करणाऱ्या आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवामध्ये आकाशकंदिलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदा दिवाळीच्या काही दिवस आधीच बाजारात विविध प्रकारांतील आकाशकंदिलांची विक्री सुरू झाली आहे. कापडी, कागदी आणि बांबूने तयार केलेल्या आकाशकंदिल बाजारात दाखल झाले असून वैविध्यपूर्ण आणि कलात्मक आकाशकंदिलांनी बाजारपेठा उजळल्या आहेत. पारंपरिक आकाशदिव्यांपासून ते प्लास्टिक, चायनीज, फोल्डींग, टोपल्या आदींनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनाही पसंती मिळत आहे. त्यातही कापडी, कागदी प्रकारातील पर्यावरणपूक आकाशकंदिलांना मागणी वाढली आहे. घराच्या सजावटीच्या छोट्या रंगबिरंगी आकाशकंदिलांचीही खरेदी होत आहे.
कापड, पुठ्ठ्याने तयार केलेल्या आणि कागदाच्या पर्यावरणपूरक कंदिलांना मागणी आहे. लोक आर्वजून हे पर्यावरणपूक आकाशकंदील विकत घेत आहेत. त्याबरोबरच फोटो फ्रेम प्रकारातील कंदिलांना यंदा मागणी आहे. विविध संस्था, कंपन्यांकडून भेट देण्यासाठी छोटे आकाशकंदील खरेदी केले जात आहेत.
एक मराठा लाख मराठा
यंदा दिवाळीसाठी फोटो फ्रेम प्रकारातील नव्या आकाशकंदिलांना मागणी असून प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेल्या फोटो फ्रेम प्रकारातील आकाशकंदिल बाजारात आहेत. तसेच “एक मराठा लाख मराठा’ असे लिहिलेले आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत. हे आकाशकंदील येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून या आकाशकंदिलांनाही मोठी मागणी असून यांचे दर किमान 150 रुपयांपासून पुढे आहेत.