पुणे – शहरात डेंग्यूचा डंख पुन्हा वाढला असून, रूग्णसंख्येने झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे प्लेटलेट्सचा तुटवडाही काही भागात जाणवत आहे. नागरिकांनी रक्तदान आणि प्लेटलेटदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे डेंग्यूच्या संख्येच उद्रेक झाला नसला तरी रुग्णसंख्या वाढलेली होती. आता ऑक्टोबर हिटनंतर थंडीची चाहुल लागली असताना, डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. मागील दहा महिन्यांत 2 हजार 702 डेंग्यूचे संशयित सापडले. त्यातील 207 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ही संख्या केवळ महापालिका रुग्णालयातील आहे.
तर, याच काळात चिकनगुनियाचे 31 रुग्ण सापडले. उन्हाळ्यामध्ये एकही रुग्ण सापडला नाही. मात्र, ऑगस्टमध्ये ही रुग्णसंख्या 7, सप्टेंबर-9 आणि ऑक्टोबरमध्ये 12 पर्यंत पोहचली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आढळून येत आहे, अशा जागांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 2 हजार 32 जणांना नोटीस देत 2 लाख 56 हजारांचा दंड वसूल केला आहे.
रक्तदान शिबिरांची संख्या घटली
दसरा, दिवाळी आणि शाळांमध्ये परीक्षा सुरू असल्यामुळे शहरातील रक्तदान शिबिरांची संख्या घटली. यामुळे प्लेटलेटचा तुटवडा जाणवू लागला आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट संख्या 50 हजाराच्या खाली आल्यावर त्याला प्लेटलेट्स दिल्या जातात. मात्र, बहुतांश ब्लड बॅंकेत प्लेटलेटचा तुटवडा असल्याचे दिसून येते.
डेंग्यु, चिकनगुनियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती सुरू आहे. डासांची पैदासाची ठिकाणी शोधून ती नष्ट केली जात आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणीही केली जात आहे. – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य प्रमुख, मनपा