पिंपरी – 2021-22 आणि 2022-23 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या इयत्ता 5 वी आणि 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना भारत दर्शन घडविण्यात येत आहे. त्यानुसार 19 विद्यार्थ्यांना 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत बंगलोर, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर शहरांची ओळख करून देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सात शिक्षकांचाही या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे. बंगलोर, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर या चार शहरांना समृद्ध करणाऱ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक तसेच शैक्षणिक समृद्धीची ओळख करून देण्याच्या दृष्टीने या शैक्षणिक दौऱ्याचे नियोजन केले आहे. या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्याची तसेच इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आणि भारतीय विज्ञान संस्था यांच्या वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची अनोखी संधी देखील मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वनीसंदेशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात आणि आकांक्षा फाऊंडेशन संस्थेच्या संचालक जयश्री ओबेरॉय यांनी विमानतळाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला झेंडा दाखवत शुभेच्छा दिल्या.
या विशेष उपक्रमाची सुरूवात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आणि शहरातील सार्वजनिक शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.