सोमाटणे – मावळ तालुक्यातील ३४० अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतीस या ४ डिसेंबर २०२३ पासून संपावर होत्या. त्यामुळे अंगणवाड्या कुलूप बंद होत्या. सर्व अंगणवाड्यांना आडगळीचे स्वरूप आले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी संप मिटल्याने या सर्व अंगणवाड्यांमध्ये बालकांचा पुन्हा किलबिलाट सुरु झाल्याचे चित्र सोमाटणे आणि परिसरातील अंगणवाड्यांमध्ये पहावयास मिळते आहे.
२७ जानेवारीपासून मावळ तालुक्यातील ३४० अंगणवाड्या पूर्ववत सुरू झाल्या असून बालकांनी गजबजल्या आहेत. बालकांना पोषण आहाराचेही वाटप केला जात आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस ४ डिसेंबरपासून संपावर गेल्या होत्या. या संपात तालुक्यातील सर्वच म्हणजे जवळपास ३४० अंगणवाडी कार्यकर्त्या व त्यांच्या मदतनीस सहभागी झाल्याने अंगणवाड्यांना कुलूप लागले होते. सुमारे दोन महिने अंगणवाड्या बंद राहिल्याने बालके ही अंगणवाड्यांपासून आणि पर्यायाने पोषण आहारापासून दुरावली होती. २७ जानेवारीपासून संप मिटल्याने अंगणवाड्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत.
आढावा बैठक
मावळ तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल कोतागाडे यांनी सोमवारी तालुक्यातील सेविका व मदतनीस यांची आढावा बैठक घेतली. बैठकीत सेविका, मदतनीस यांनी रुजू झालेला अहवाल कार्यालयात सादर करावा. अंगणवाडी परिसराची स्वच्छता करावी. पोषण टँकरच्या नोव्हेंबर २०२३ नुसार ३ ते ६ वयोगटातील बालकांना आहार वाटप करण्यात यावा. आहार वाटप केल्या बाबत अंगणवाडी केंद्र निहाय पर्यवेक्षकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्याचा मासिक अहवाल कार्यालयात सादर करण्यात यावा. पोषण ट्रँकर अपडेट करण्यास सांगावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
माझ्याबीट मधील सर्व अंगणवाड्या पुर्वीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. सर्व दैनंदिन कामकाज सुरु झाले आहे. शिवाय बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण सुरु करून रोजचे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– सुधा देसले, अंगणवाडी पर्यवेक्षिका.
तालुक्यातील ३४० अंगणवाड्या संप मिटल्याने पूर्ववत सुरु झाल्या आहेत. अंगणवाडीत आलेल्या बालकांना पोषण आहाराचे वाटपही करण्यात आले आहे. स्तनदा माता व गर्भवती माता यांनाही पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. सर्व सेविकांना रोजचे कामकाज नियमित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– विशाल कोतागडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, मावळ तालुका.