श्रीगोंदा – प्रेमविवाह होऊनही ती आता सोबत यायला तयार नसल्याने एका तरुणाने पोलीस निरीक्षकांच्या दालनात औषध पिल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.३१) सांयकाळी घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका तरुणाने महिनाभरापूर्वी तालुक्यातील एका गावातील तरुणीशी देवाची आळंदी येथील एका मंगल कार्यालयात आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. मात्र, याचा थांगपत्ता तिच्या कुटुंबीयांना नसल्याने ती लग्न करून आल्यानंतरही वडिलांच्याच घरी राहत होती. तिने आंतरजातीय विवाह केल्याची कुणकुण घरातील मंडळींना लागली होती.
त्याचवेळी पत्नी नांदन्यास येत नसल्याने त्या तरुणाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी दहा ते बारा लोक बुधवारी (दि.३१) सायंकाळी पोलीस निरीक्षकांसमोर दालनात बसले होते. त्यावेळी मुलीने मुलासोबत जाण्यास नकार दिला. तिला वडिलांकडे जाण्याचे सांगण्यात आले. त्यावेळी समोरच खुर्चीवर बसलेल्या मुलाने पॅन्टच्या खिशातून औषधाची बाटली काढून ती पिण्यास सुरुवात केली. तो अचानक जमिनीवर कोसळला. त्याच्या अचानक कृतीमुळे पोलीस निरीक्षकांसह त्या दालनात बसलेली सगळीच मंडळी गडबडून गेली. पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोलावून घेत त्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, घटना घडली त्यावेळी पोलीस निरीक्षकांसह तिथे एक जेष्ठनेतेही उपस्थित होते. मात्र, चर्चा सुरू असतानाच अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस निरीक्षकांसह सर्वच उपस्थित गडबडून गेले. याप्रकाराची पोलीस ठाण्याच्या परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.