नगर -करोना संसर्गामुळे मुलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असल्याने राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दररोज नैतिकतेचे संस्कारमुल्य शिबिरार्थींना दिले जात असल्याचे शिबिरप्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी सांगितले.
मंगळवार 7 एप्रिल पासून सकाळी 11 ते 11.45 यावेळेत संस्कारमुल्य शिबीर सुरु करण्यात आले.
मुलांना आनंद देणे, कौटुंबिक वातावरणात संस्कारमुल्य देता यावे, आरोग्यासाठी योगाभ्यास देता यावा, मुलांचे सांस्कृतिक परिवर्तन घडावे, हे सर्वकाही शिबिरार्थींच्या सहभागाने पूर्णपणे सफल झाले. यासाठी शिबिरात योगाभ्यासक दत्ता दिकोंडा, भीमराज कोडम, गोविंद आडम, धनेश गांधी, दत्तात्रय अंकम, विवेक पवार, बापू जोशी, अल्लाउद्दीन शेख, बाजीराव जाधव, नेहा कर्डिले आदी परिश्रम घेत आहे.
शिबिरामध्ये नैतिकतेचे संस्कारमुल्य शिबिरार्थींना दिले जात आहे. यामध्ये संवेदनशीलता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्री-पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा, सर्वधर्मसहिष्णूता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सौजन्यशीलता, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता यांचा समावेश होता. तनमनाने सर्व शिबिरार्थी उत्साहाने या शिबिरात सहभागी होत असल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले.