नगर – बुरुडगाव कचरा डेपोतील खत प्रकल्पात पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. महापालिकेच्या खतनिर्मिती प्रकल्पातील गैरकारभार प्रकरणी मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता – निरीक्षकांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित – करण्यात आली. मात्र, खतनिर्मिती प्रकल्पाच्या ठेकेदारावर अद्याप कारवाई झालेली नाही.
महापालिकेच्या नोटिसीनंतर १० मार्च रोजी ठेकेदाराने कचरा विलगीकरणासाठीच्या मशीनरी डेपोत आणल्या आहेत. त्याचा पंचनामाही करण्यात आला आहे. मात्र, याबाबत कारवाई न झाल्याने महापालिका प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बुरुडगाव कचरा डेपोतील खत प्रकल्पात पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही.
कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. त्यानंतर तत्कालीन विभाग प्रमुख सपना वसावा यांनी स्वतः तपासणी केली. चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पात कचरा विलगीकरणासाठीच्या मशीनरी नसल्याचे यात समोर आले.
माझ्याकडे उपायुक्त पदाचा प्रभारी कार्यभार आहे. घनकचरा विभाग प्रमुख पदाचा कार्यभार असतानाच प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. ठेकेदाराने सादर केलेल्या खुलाशावर पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव देणार आहे.
सपना वसावा, सहाय्यक आयुक्त, मनपा