नगर : चेन्नई येथील क्रिसेंट इन्स्टीट्युट ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी येथे आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले आहे. या संघातील नगरचा खेळाडू दिशान गांधी याला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. या अगोदरच्या 4 वर्षीही पुणे विद्यापीठाने कॉर्फबॉल स्पर्धेत वर्चस्व राखले आहे.
या वर्षी पुणे विद्यापीठ संघाने ॲपेक्स विद्यापीठ, राजस्थान, क्रिसेंट चेन्नई, एमडीयु विद्यापीठ रोहटक हरियाणा, कॉलिकट विद्यापीठ केरळ या संघांचा पराभव करीत प्रथम क्रमांक व सुवर्णपदक मिळवले. यात दिशानने उत्कृष्ट कामगिरी करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
दिशानने कॉर्फबॉल क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. या यशापासून प्रेरणा घेत नगरमध्ये जिल्हा कॉर्फबॉल असोसिएशनची स्थापना करण्यात आली तसेच पेमराज सारडा महाविद्यालयात मैदानाचीही उभारणी करण्यात आली आहे. दिशान हा सारडा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
या यशाबद्दल त्याचे हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.अनंत फडणीस, अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, अजय बोरा, डॉ.पारस कोठारी, प्राचार्या गावित मॅडम, प्रा.संजय धोपावकर आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य भाबड सर, कॉर्फबॉल असोसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व सर्व पदाधिकारी तसेच विविध मान्यवरांनी दिशान गांधी याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.