सोलापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे बाधित रूग्णाची संख्या तसेच मृतांची संख्या देखील वाढत आहे. त्यातच आज सोलापूरात एका व्यक्तीचा (56 वर्षीय) कोरोनामुळे बळी गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच कोरोनाचा बळी ठरला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
हा रूग्ण दहा तारखेला रूग्णलयात दाखल झाला होता. पहाटे(दि. 11 एप्रिल) रोजी तो मरण पावला. त्यांनतर आज दुपारी 3.30 वाजता त्या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. मृत व्यक्ती हा सोलापूरातील पाच्छा पेठ परिसरातील किराणा दुकान चालक होता. त्यामुळे सदर किराणा दुकानदार हा कोणा कोणाच्या संपर्कात आला होता याची चौकशी पोलीस प्रशासन करत असून येथील संपूर्ण परिसर हा सील करण्यात आला आहे.