कंधहार: अफगाणिस्तानच्या 20 सरकारी अधिकाऱ्यांची तालिबानकडून सुटका केली जाणार आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने ट्विटरवर ही माहिती दिली. या अधिकाऱ्यांना “रेड क्रॉस’च्या आंतरराष्ट्रीय समितीकडे हस्तांतरित केले जाईल, असे शाहीनने म्हटले आहे.
बुधवारपासून अफगाणिस्तानच्या प्रशासनाने 300 तालिबान्यांची सुटका केली. तालिबान आणि अमेरिकेदरम्यान 29 फेब्रुवारीला झालेल्या कराराव्यतिरिक्त या तालिबान्यांची सुटका करण्यात आली होती. या करारानुसार अफगाणिस्तान सरकारला 5 हजार तालिबान्यांची सुटका करायची आहे. तर तालिबान्यांना 1 हजार अफगाण अधिकाऱ्यांची सुटका करायची आहे.
अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार झाल्यानंतरही तालिबानच्या हिंसाचाराला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जायला सुरुवात झाली होती. त्यामुळे तालिबान-अमेरिकेतील कराराचे भवितव्य धोक्यात आले होते. हा धोका टाळण्यासाठी तालिबानने अफगाणी अधिकाऱ्यांच्या सुटकेला सुरुवात केली आहे.