पिंपरी – मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशातील काही भागातून तो परतला आहे. महाराष्ट्रातून देखील तो परतीच्या वाटेवर असून, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून “ऑक्टोबर हिट’चा चटका जाणवत आहे. दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने आता पिंपरी चिंचवडकर हैराण होऊ लागले आहेत. देशातील उत्तरेच्या काही भागातून मॉन्सून पूर्णपणे परतला आहे. तो हळूहळू महाराष्ट्रातूनही जाईल. पिंपरी चिंचवड, पुणे शहरातूनही मॉन्सून परतीच्या वाटेवर जाईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर, हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारचे तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चांगलाच चटका बसत असून “ऑक्टोबर हिट’ जाणवत असल्याने दुपारी बाहेर फिरताना घाम फुटत आहे. शहरात शुक्रवारी (दि. 6) दुपारचे तापमान 32 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. शुक्रवारी (दि.6) शहरातील आकाश दुपारी निरभ्र आणि सायंकाळी ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.