शिर्डी -तिरुपती मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाताना भारतीय पेहराव घालणे बंधन कारक करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरातही भक्तांनी भारतीय पेहराव परिधान करूनच यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आले असून तोकडे कपडे परिधान केलेल्या भाविकांना दर्शनासाठी जाता येणार नाही. साईसंस्थानच्या या निर्णयाचे शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, पाश्चात्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती व परंपरा काळाच्या ओघात नष्ट होत चालली आहे. किमान मंदिरात दर्शनासाठी जाताना भारतीय पेहराव परिधान करण्याची असल्याची मागणी होत आहे. अनेक जण पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करून तोकडे कपडे घालून येतात. याबाबत साई मंदिर प्रशासनाला काही भाविकांनी याबाबत सूचना केल्या आहे.
त्यानुसार साई संस्थान व्यवस्थापनाने दर्शनासाठी ड्रेसकोड तयार केला आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भक्त येतात. आता लॉकडाऊननंतर साई मंदिर खुले झाल्याने शिर्डीत गर्दी होत आहे. त्यामध्ये काही भक्त हे तोकडे कपडे घालून दर्शनाला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आल्यानंतर साई संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी भारतीय पेहराव परिधान करून साई दर्शनासाठी यावे, असे आवाहान करणारे फलकच जागोजागी लावले आहे. भारतीय पेहराव घातल्यानंतरच दर्शन दिले जाईल, असे या फलकांवर नमूद करण्यात आले आहे. मुंबई येथून आलेले साईभक्त राहुल सचदेव यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.