आरटी-पीसीआर चाचण्या न केलेले प्रवासी पुण्यात
महापालिकेच्या तपासणीत आढळले 15 बाधित
पुणे – दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधून विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी राज्य शासनाने बंधनकारक केली आहे. त्यानुसार, प्रवाशांनी चार दिवस आधी केलेल्या चाचणीचा अहवाल असेल तरच प्रवाशांना बोर्डिंग पास देणे आवश्यक असताना; विमान कंपन्यांकडून मात्र या नियमाला हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. या चार राज्यांतून शेकडो प्रवासी चाचण्या न करताच पुण्यात येत आहेत. यावर दि.25 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत या 375 प्रवाशांची महापालिकेने करोना चाचणी केली. यामध्ये तब्बल 15 जण बाधित आढळले आहेत.
याबाबत महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी माहिती दिली. काही राज्यांत करोनाचे नवीन बाधित वेगाने सापडत असून या राज्यांमध्ये करोनाची दुसरी लाट आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्याचवेळी शहरात करोनाचा आलेख उतरणीला आहे. मात्र, या राज्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक महाराष्ट्रात रेल्वे तसेच विमानाने येत आहेत. परिणामी, त्यांच्यामुळे करोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने आदेश काढून या प्रवाशांवर बंधने घातली आहेत.
त्यात या प्रवाशांना चार दिवस आधी करोना चाचणी बंधनकारक असून त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल, तरच महाराष्ट्रात प्रवेश असणार आहे. त्यासाठी विमान कंपन्यांनीच चाचण्या न करणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंग पास देऊ नयेत अशा केंद्राच्याही सूचनाही आहेत. मात्र, तरीही पुण्यात या चार राज्यांतून येणाऱ्या विमान प्रवाशांमध्ये चाचणी न केलेल्या नागरिकांचा आकडा लक्षणीय आहे.
कंपन्यांचा आडमुठेपणा; पालिकेवर ताण
या 4 राज्यांतील प्रवाशांमुळे इतर राज्यांत करोना बाधित वाढू नयेत, म्हणून करोना चाचणी अहवाल असल्याशिवाय प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यास विमान कंपन्यांना केंद्राने मनाई केली आहे. मात्र, कंपन्या आदेशाला हरताळ फासत आहेत. दररोज सरासरी 50 ते 60 प्रवाशी चाचण्या न करताच या राज्यातून पुण्यात येत आहेत. विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर आपली जबाबदारी संपत असल्याने विमान कंपन्या जाणीवपूर्वक या प्रकाराला खतपाणी घालत आहेत. या आडमुठेपणाचा फटका महापालिकेस बसत आहे. हे प्रवासी आल्यानंतर त्यांचे विलगीकरण, त्यांच्या तपासण्या, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आठ दिवस या प्रवाशांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे लागत असून, आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.