दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून

राहुरी विद्यापीठ -दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. त्यात शीतल बाबासाहेब गोलवड (वय 30) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्‍यातील देवळाली प्रवरा येथील आंबी स्टोअर परिसरात शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर दहाच तासांतच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, शुक्रवारी रात्री बाबासाहेब विठ्ठल गोलवड (वय-35) हा दारू पिवून उशिरा घरी आल्यानंतर पत्नी शीतल हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागू  तोपर्यंत लाडजळगाव लागला. शीतल हिने माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगून ती झोपण्यास गेली. बाबासाहेब याने शीतलशी भांडण केले. परंतु शीतलने मला मजुरी मिळालेली नाही. शनिवारी मजुरी मिळाल्यावर पैसे देते, असे सांगितले. परंतु बाबासाहेबने मला आता दारू पिण्यासाठी पैसे दे, असा हट्ट धरला.

पतीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत दोन्ही मुलांसमवेत शीतल झोपली असताना बाबासाहेब याने घरासमोर पडलेला लाकडी दांडा तिच्या डोक्‍यात घातला. त्यात शीतल हिचा जागीच मृत्यू झाला. रागाच्या भरात पत्नीच्या डोक्‍यात लाकडी दांडा मारल्यानंतर व ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून बाबासाहेब याने घटनास्थळावरुन धूम ठोकली. खुनाच्या घटनेची माहिती दोन्ही मुलांनी शेजारी राहात असलेल्या उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांना दिली.

त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेतली. तसेच खून करण्यासाठी वापरलेला लाकडी दांडा ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली. घटनास्थळापासून काही अंतरावरील उसाच्या शेतात लपून बसलेल्या बाबासाहेब यास स्थानिक तरुणांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. शीतलचा भाऊ विजय एकनाथ बर्डे याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.