उदे ग अंबे उदे…!

मोहटादेवी गडावर विधिवत घटस्थापना नवरात्रोत्सवाला प्रारंभ

पाथर्डी -शारदीय नवरात्रोत्सवाला मोहटा देवस्थानसह तालुक्‍यात सर्वत्र पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला. करोना साथरोगामुळे शासनाने दर्शनासह यात्रेला बंदी घातल्याने हजारो भाविक पायी चालत येत मोहटा देवी मंदिराच्या पायरीवर डोके टेकवून माघारी फिरले. देवी गडासमोरून अनेक भाविकांनी प्रथेप्रमाणे मशाली पेटवून नेल्या. आज सकाळी साडेअकरा वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष

 

तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे व अस्मिता भिलारे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. बबन देवा कुलकर्णी, राजू देवा मुळे, भूषण देवा साकरे, शरद देवा कोतनकर यांनी पौरोहित्य केले. वेद मंत्रोच्चाराने गाभारा दुमदुमला. मात्र ध्वनिवर्धक लावण्यास निर्बंध असल्याने मंदिराबाहेर नीरव शांतता होती.

घटस्थापनेला विश्‍वस्त अशोक दहिफळे, अशोक भाऊ दहिफळे, भीमराव पालवे, आदिनाथ आव्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, सहायक अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते. दुपारनंतर प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्‍याम वाडकर, पाथर्डीचे न्यायाधीश शरद देशमुख, ऍड.विजय वेलदे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे आदींनी भेट देवून पाहणी केली.

रविवारपासून मोहटा गडाकडे येणारे सर्व रस्ते बंद करून भाविकांना मंदिराकडे येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मोहटा देवस्थान समितीने एसटी पार्किंग जवळील कमानीपुढे देवीचा मोठा फोटो लावून भाविकांच्या दर्शनाची सोय करण्याची मागणी होत असली, तरी त्यावर अंतिम निर्णय प्रांताधिकारी घेतील शकतील, असे सांगण्यात आले. देवस्थान समितीने मंदिराव आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, ती पाहण्यासाठी भाविक नाहीत. देवीसह भक्तांच्या स्वागतासाठी फुललेला निसर्ग सुद्धा यंदा एकाकी पडला आहे.

सकाळ-सायंकाळ आरती, देवी पाठ, सप्तशती पाठ, 64 योगिनी पूजन, असे विधी होतील. अन्य सर्व उत्सवांना फाटा देवून आज मुखवट्याची मिरवणूक निघाली नाही. पालखी उत्सव सुद्धा होणार नसून, कुस्त्यांचा हगामा रद्द करण्यात आला आहे. धामणगाव देवी, शहरातील कालिकामाता, कदम मंदिर, तिळवण तेली समाज, हिंगलाज माता, चौंडेश्‍वरी मंदिर, गाडगे अमराई, चिंतामणी मंदिर, आष्टवाडा व आखार भागातील चौंडेश्वरी मंदिर येथे घटस्थापना करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.