सातारा – सातारा शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या लल्लन उर्फ अजय जाधव (रा. प्रतापसिंहनगर) याच्यासह त्याच्या टोळीतील 16 जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकाद्वारे दिली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईचे आदेश दिले. टोळीप्रमुख अजय उर्फ लल्लन जाधव, राजू उर्फ बंटी नवनाथ लोमटे, ओंकार भरत देढे, विकास रमेश खुडे, रोहित लक्ष्मण उकिरडे, मधुरमा दत्तात्रय जाधव, अनिता दत्तात्रय जाधव, दत्तात्रय उर्फ गदरिया काशिनाथ आसवरे, जय अमर कांबळे, सुनील सुखदेव वाघमारे, मच्छिंद्र उर्फ टाकल्या भगवंत बोराटे, किरण नागनाथ उकिरडे, सागर रामा खुडे, विजय उर्फ बबल्या जाधव,पम्मी उर्फ अमिता दत्तात्रय बोराटे उर्फ जाधव, सुनीता दत्तात्रय जाधव (सर्व रा. प्रतापसिंहनगर खेड) यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीने पंधरवड्यापूर्वी घरात घुसून तलवारी, कोयते, लाकडी दांडके घेऊन एका कुटुंबीयांना मारहाण केली. तसेच महिलांचा विनयभंग होईल असे वर्तन केले होते. या टोळीविरोधात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यामार्फत मोका कारवाईचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पाठवण्यात आला होता. फुलारी यांनी या घटनेची पडताळणी करून तसेच या टोळीच्या विरोधातील गुन्ह्यांच्या कागदपत्रांचे अवलोकन करून त्यांच्या गुन्ह्यास मोका कायद्यान्वये कलमवाढ करण्याची परवानगी दिली. उपअधीक्षक राजीव नवले यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर 2022 पासून दहा मोका प्रस्तावांमध्ये 128 जणांविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 101 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोका, हद्दपार, एमपीडीए अशा कठोर कारवाया करण्यात येणार आहेत. या प्रस्तावप्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक नितीन केणेकर, अमित सपकाळ, संदीप पवार, प्रसाद जाधव, सुनीता ढेकणे, अमोल साप्ते, रोहित पवार, अजित फरांदे, श्रीकांत बामणे यांनी या कारवाईसंदर्भात सहकार्य केले.
टोळीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद
अजय जाधव उर्फ लल्लन या टोळीने प्रतापसिंहनगर येथे दहशत माजवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, चोरी, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याची तयारी करणे, जबर दुखापत, घरफोडी, शासकीय कामात अडथळा, विनयभंग, बलात्कार, अपहरण, हद्दपार आदेशाचे उल्लंघन इत्यादी गुन्ह्यांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती.