पुणे – दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्याचा पाठलाग करताना गुन्हेगाराने पोलिसांवर गोळी झाडली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी तीन राऊंड फायर केले. यानंतर त्याच्या दुचाकीला गाडी आडवी घालून त्याला साथीदारासह जेरबंद केले. हा थरार एनडीए परिसरातील मुठा रस्त्यावर मंगळवारी दुपारी घडला.
नवनाथ नीलेश वाडकर(१८ रा. जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. केतन साळुंखे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पत्रकारावरील हल्यातील गुन्हेगार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ हा सराईत गुन्हेगार आहे. तो सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देत नवनाथने पळ काढला होता.
याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. तो मुठा परिसरात पिस्तूल घेऊन आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण यांचे पथक दोन कारमधून त्याच्या मागावर गेले. एनडीए रस्ता येथे दुचाकीवरुन साथीदारासह जाताना तो दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केल्यावर त्याने पोलिसांवर गोळी झाडली. त्याला प्रत्युत्तदरादाखल पोलिसांनी त्याच्यावर तीन राऊंड झाडले.
पर्वतीतील गँगवारचा भाग
पर्वती परिसरात नीलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या अशा दोन टोळ्या कार्यरत होत्या. वर्चस्ववादातून दोन्ही गँगमध्ये अनेकदा भडका उडत होता. दरम्यान, चॉकलेट सुन्याच्या टोळीने २०१८ मध्ये नीलेश वाडकर याचा पर्वती पायथा येथे खून केला. यामध्ये चॉकलेट सुन्यासह २२ जणांना अटक करण्यात आली. नंतर चॉकलेट सुन्या गँगला मोक्काही लागला.
दरम्यान, तेव्हा नीलेश वाडकरचा मुलगा नवनाथ हा अल्पवयीन होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो धडपडत होता. दरम्यान, वाडकर गँगमधील काही सदस्यांनी चॉकलेट सुन्याच्या भावाचा खून केला. तर नवनाथने अल्पवयीन असतानाच दोन जणांच्या खुनाचा प्रयत्न केला. नवनाथवर अल्पवयीन असतानापासून तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, नवनाथने दोन महिन्यांपूर्वीच वयाची १८ वर्षे पूर्ण केली. तर दुसरीकडे चॉकलेट सुन्यासह चौघे नीलेश वाडकरच्या खुनाच्या गुन्हयातून नुकतेच जामिनावर बाहेर आले. ही माहिती नवनाथला मिळताच त्याने हत्याराची जुळवाजुळव केली. बदला घेण्याची संधी नवनाथ शोधत असतानाच दुसरीकडे खंडणी विरोधी पथकही त्याच्या मागावर होते.