पुणे – पुण्यात भाजपपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यादीही जाहीर करण्यात आली आहे. मनसेने 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर तसेच कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेनेही रणशिंग फुंकले आहे.
मनसेच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून माजी नगरसेवक ऍड. किशोर शिंदे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे यांनी 2009 तसेच 2014 मध्ये या मतदारासंघातून जोरदार लढत दिली होती. तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेनुसार पक्षाकडून महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मोरे यांनी 2009 मध्येही निवडणूक लढविली होती. तर 2014 मध्ये मनसेकडून नाना भानगिरे उमेदवार होते. शिवाजीनगरमधून मनसेने यावेळी नवा चेहरा दिला असून सुहास निम्हण हे उमेदवार आहेत. 2014 मध्ये येथून रणजीत शिरोळे उमेदवार होते. दरम्यान, कसबा मतदारसंघात पक्षाच्या रूपाली पाटील यांचे नाव चर्चेत असताना; अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मनसेकडूनही महिला उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिंदे यांचे नाव आल्याने राजकीय चर्चा वाढल्या आहेत.