कार्यकर्त्यांसह रॅली; इस्लामपूरचे वातावरण झाले “जयंत’मय
इस्लामपूर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. रॅलीतील शक्तीप्रदर्शनाने इस्लामपूर शहरातील वातावरण “जयंत’मय झाले होते.
पाटील यांनी पंचायत समितीच्या आवारात येऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. येथूनच ढोलताशा, लेझीम व बेंजोच्या निनादत भव्य रॅली सुरू झाली. ही रॅली झरी नाका, आझाद चौक, लाल चौक, गांधी चौक, यल्लमा चौकातून कचेरी चौकात आली. जागोजागी महिला भगिनींनी औक्षण करून फुलांचा वर्षाव केला. कचेरी चौकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. दिवसभरात संपूर्ण शहर “जयंत’मय झाले होते. त्यानंतर माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा झाली. इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडे जयंत पाटील यांनी अर्ज सादर केला.
वाळवा पंचायत समितीपासून कचेरी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर कचेरी चौकात जाहीर जाहीर सभा झाली. यावेळी आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. मानसिंग नाईक, क्रांती समुहाचे अरुणअण्णा लाड, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, राज्य बॅंकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जनार्दनकाका पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील, राजवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे भाजपचे संचालक डॉ. प्रताप पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या दलित महासंघाने पाठिंबा दिला.
जयंत पाटील म्हणाले, “”निवडणुका झाल्यानंतर पुरग्रस्तांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी जोमाने काम करावे लागेल. मी कोणावर टीका करणार नाही. सगळेच आपले मित्र आहेत. आपण शत्रूशीही मित्रासारखे वागतो. सामान्य माणसांची प्रामाणिक सेवा हे व्रत घेवून आपण गेल्या 35 वर्षापासून अव्याहतपणे काम करीत आहे. त्यातूनच तुमच्याशी हा जिव्हाळा निर्माण झालेला आहे.”
यावेळी राज्य सरचिटणीस ऍड. चिमणभाऊ डांगे, शहर युवकाध्यक्ष खंडेराव जाधव, अरुणभाऊ कांबळे, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, पै. भगवान पाटील, माजी सभापती वैभव पाटील, झुंझार पाटील, भागवत जाधव, विलास भिंगार्डे, कविता पाटील यांनी तडफदार भाषण करून एक लाखाचे मताधिक्य मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर यांनी आभार मानले. युवक राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सभेस झुंझारराव शिंदे, प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, अविनाश पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्यथा डिपॉझिट जप्त करू
इस्लामपूर मतदारसंघात डिजिटल पोस्टर लावून भावी आमदार म्हणून घेणाऱ्या निशिकांत पाटील यांनी हिम्मत असेल तर निवडणुकीत उभे राहावे, असे आव्हान अनेक वक्त्यांनी दिले. भाजपमधून निवडणूक लढवण्याची तयारी करताना इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडे राहिल्याने निशिकांत पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली, त्यांनी अपक्ष उभेच राहावे, त्यांचे डिपॉझिट जप्त करू, असे आव्हान सभेत दिले.