सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – नवीन मोटार घेण्यासाठी माहेरच्यांकडून 5 लाख रुपयांची मागणी केली. नवविवाहितेचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. मानसी अमर साखरे (वय 19 रा. इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनी तळेगाव दाभाडे मूळ परळी वैद्यनाथ जि. बीड) आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी नवविवाहितेचे वडील नितीन संपतराव शिंदे (रा. परळी वैद्यनाथ जि. बीड) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अमर अर्जुन साखरे (वय 26), अर्जुन नामदेव साखरे (वय 55), अंकित अर्जुन साखरे (वय 24) व अनिता अर्जुन साखरे (वय 50) सर्व (रा. इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनी तळेगाव दाभाडे ता.मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पती, सासरे व दीर यांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नवविवाहिता मानसी हिचे पती अमर साखरे यांच्या सोबत 26 मे 2019 रोजी परळी वैद्यनाथ येथे लग्न झाले. त्यानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी मानसी यांच्याकडे मोटार घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्याला मानसी यांनी नकार दिला.

त्यामुळे सासरच्या मंडळींनी त्यांचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून अखेर नवविवाहिता मानसी हिने अवघ्या सहा महिन्यातच राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.