वायसीएमच्या नव्या इमारतीचे काम संथगतीने

पिंपरी (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) परिसरात नव्याने होणाऱ्या अकरा मजली इमारतीचे काम आठ महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. मेडिकल कॉलेज व रुग्णाच्या सोयीकरिता नोव्हेंबर 2017 मध्ये मंजूर झालेल्या 50 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

वायसीएम रुग्णालयातील ताण कमी व्हावा यासाठी नवीन इमारत उपयुक्त ठरणार आहे. रुग्णालयात येणाऱ्या वाहनांची व नातेवाईकांची वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीही याठिकाणी नित्याचीच झाली आहे. सध्या रुग्णालयात येणाऱ्या वाहनांसाठी आत व बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. पार्किँगच्या जागेमध्येच नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने पार्किंगच्या समस्येने उग्र रुप धारण केले आहे. यामुळे अनेक नागरिकांमध्ये वाद होतात.

नव्या इमारतीसाठी सध्या दोन जेसीबीच्या माध्यामातून खोदकाम सुरू आहे. मात्र आठ महिने होऊनही अद्याप खोदाईच सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. इमारतीचा पायाही अद्याप उभारला गेला नाही. महापालिकेचा स्थापत्य विभाग रुग्णालय बांधकामाचे काम पाहत आहे. इमारतीच्या जलद कामकाजासाठी कर्मचाऱ्यांकरिता केबिनची व्यवस्था करण्यात आली आहे. वायसीएममध्ये येणाऱ्या रुग्णावाहिका व वाहतूक मालाच्या वाहनांनादेखील पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी तीस महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र आठ महिने होऊनही अद्याप खोदकामच सुरू आहे. त्यामुळे हे काम मुदतीत पूर्ण होणार का असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

अशी होणार नवीन इमारत – 

वायसीएम रुग्णालय परिसरात अकरा मजली इमारतीचे काम सुरू आहे. यामध्ये तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल. तसेच चौथ्या मजल्यावर रात्र निवार केंद्र व सातव्या मजल्यावर डॉक्‍टरांच्या निवासाची सोय असणार आहे. तळमजल्यावर कॅंटिंगची सोय केली आहे.

मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या कॉलेजसाठी यातील काही भाग असणार आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज असे ग्रंथालय या इमारतीमध्ये उभारले जाणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांच्या होस्टेलसाठी यातील काही भाग वापरला जाणार आहे. राखीव वॉर्ड रुग्णासाठी तयार केले जाणार असल्याने वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)