पिंपरी – करोना विषाणूचा संसर्ग व धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिका मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांमध्ये घेण्यात येणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी काढले आहेत.
शुक्रवारी (दि. 1) महाराष्ट्र आणि कामगार दिन आहे. दरवर्षी या दिवशी महापालिका प्रांगणात महापौरांच्या हस्ते तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभाग अध्यक्ष/क्षेत्रीय अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात येतो. तथापि, यंदा करोना विषाणूचा संसर्ग व धोका टाळण्यासाठी यंदाचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी (पुणे) यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
पत्रानुसार फक्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित कार्यक्रम करण्यात येणार आहे. पर्यायाने, शुक्रवारी महापालिका प्रांगण, प्रभागामध्ये अथवा महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात येऊ नये. याची सर्व विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.