नगर – जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारातून संरक्षण किट पळविल्याच्या त्या कथित घटनेचा लवकरच तपास होईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले. घटनेच्या तपासाबाबत शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी आज त्या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली.
पालकमंत्री मुश्रीफ आज नगर दौऱ्यावर आहेत. भोर यांनी आज त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयातून पळविण्यात आलेल्या त्या संरक्षण किट संदर्भात माहिती दिली. या संदर्भात मूळ तक्रारदार यांनी केलेली तक्रार व त्यानंतर भोर यांनी स्वत: केलेल्या तक्रारी, तसेच दैनिक प्रभातने या संदर्भात केलेच्या वार्तांकनाच्या प्रती सादर केल्या.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी सर्व घटनाक्रम समजून घेतला. त्यात जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या समितीने तपास करण्यास दर्शविलेली असमर्थताही पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या सर्व घटनाक्रमाचा छडा लावण्यासाठी नवीन समिती नेमण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी सूचना दिल्याने भोर यांनी प्रभातला सांगितले.
जिल्हा सरकारी रुग्णालयातील तीन डॉक्टरांची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, ते समकक्ष असल्याने तसेच त्यांच्यावरच अतिरिक्ति दबाव आल्याने त्यांनी ही चौकशी करण्यास नकार दिला असल्याची गंभीर बाबही पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी किंवा वैद्यकीय विभागाचे विभागीय पातळीवरील अधिकारीच या घटनेचा पारदर्शीपणे तपास करू शकतात, अशी भूमिकाही भोर यांनी मांडली.
सामाजिक जिल्हा सरकारी रुग्णालयामधून पळविण्यात आलेल्या कथित संरक्षण किटचा तपास करण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात येईल. त्यामुळे पुढील चौकशी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी पूर्ण करतील. यातील दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल.
हसन मुश्रीफ , पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य