लोणावळा – नुकत्याच मावळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक झाली नव्हती. न्यायालयाने निवडणुका घेण्याबाबतचा निर्णय दिल्यानंतर निवडणूक आयोग कामाला लागले. येत्या 20 डिसेंबर रोजी वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुकही कामाला लागले आहेत.
वाकसई ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी तहसिलदार निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागवणे व सादर करण्यासाठी 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (शनिवार व रविवार हे सुट्ट्यांचे दिवस वगळून) वेळ असणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र छाननी 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्यानंतर प्रचाराला सुरूवात होणार असून 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी हे विजयी उमेदवारांबाबत अंतिम सूचना प्रसिद्ध करणार आहेत.