पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन दिवसांत 26 लाख 54 हजार 250 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने 32 प्रभागांमध्ये एकूण 16 वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांच्या वतीने आतापर्यंत एकूण अनेक ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यातील बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 1981 नुसार नोटीस बजावण्यात आली होती.
वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आतापर्यंत एकूण 12 लाख 92 हजार 250 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शुक्रवारी 13 लाख 62 हजार असा दोन दिवसांत 26 लाख 54 हजार 250 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
… कामाची जागाही सील
प्रदूषण नियंत्रण पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन फोटो किंवा व्हिडिओग्राफीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे. या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात असून नोटीस जारी करून कामाची जागा सील केली जात आहे. नोटीस बजावलेल्यांची संख्या, वसूल केलेला दंड आणि दररोज होणाऱ्या कारवाईची या पथकांद्वारे नोंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने पालिका प्रयत्नशील असून त्यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. वायू प्रदूषण नियंत्रण पथकातर्फे शहरातील विविध जागांची पाहणी करण्यात येत आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. शहरातील नागरिकांनीही वायू प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक