पुणे – नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या (आयओडी) आजीव सदस्यपदी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आणि इन्स्टिट्यूट्सचे कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांनी दोघांचेही अभिनंदन केले.
“आयओडी’ ही भारतासह परदेशातील कॉर्पोरेट संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्वोच्च व्यावसायिक संघटना आहे. गेल्या 31 वर्षांपासून ही संघटना सदस्य मंडळ समुदायाला सेवा देते. या संघटनेशी जगभरातील 31 हजारांहून अधिक मंडळ सदस्य जोडलेले आहे. यात विविध विषय आणि प्रश्नांवर चर्चा होते.
ग्लोबल बिझनेस मीट आयोजित करून जगभरातील उद्योजक, धोरणकर्ते आणि सदस्य मंडळाला एकत्रित आणले जाते. यात मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, बॅंकर, सल्लागार, शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे नेटवर्किंग, व्यवसाय वृद्धी व विस्ताराची संधी एकाच छताखाली उपलब्ध होते.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “या सदस्यत्वामुळे नियमित होणाऱ्या चर्चा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च व्यवस्थापनातील लोकांचे नेटवर्किंग याची संधी मिळणार आहे. “सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना भारतात व बाहेरच्या देशांतील कंपन्यांशी जोडण्याची, इंटर्नशिप, नोकरी व प्रकल्प करण्याची संधी यामुळे उपलब्ध होईल.’