वॉशिंग्टन – अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन हे पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतःच ही माहिती दिली आहे. अर्थात निवडणूकीबाबत बायडेन उत्सुक असल्याबद्दलची औपचारिक घोषणा अद्याप होणे बाकी आहे.
जिल बायडेन या नुकत्याच नामिबिया आणि केनियाच्या दौऱ्यावरून परतल्या आहेत. तेथील कुपोषण आणि दुष्काळाबाबतची आपली निरीक्षणे नोंदवल्यानंतर पत्रकारांनी त्यांना बायडेन यांच्या निवडणूक लढवण्याच्या शक्यतेविषयी विचारले होते. त्यावर “ज्यो बायडेन लवकरच आपल्या प्रचाराची सुरुवात करतील.’ असे जिल बायडेन म्हणाल्या. मात्र 80 वर्षीय बायडेन या 2024 च्या निवडणूकीच्या शर्यतीतून स्वतः माघार घेतील का, असे विचारल्यावर त्यांनी ही शक्यता नाकारली.
बायडेन यांच्या निवडणूकीबद्दलच्या योजनांबद्दल जिल बायडेन यांच्याकडे अधिकृत माहिती असणार हे नक्की आहे. मात्र ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित करण्यापूर्वी बायडेन यांना आपल्या सल्लागारांशी चर्चा करावी लागणार आहे.
जर ही निवडणूक लढवून पुन्हा निवडून आले, तर बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध अध्यक्ष ठरतील. वयाचा मुद्दा गौण असून आपण फेरनिवडीसाठी उत्सुक असल्याचे बायडेन यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे.