Iran-Israel War – इराण- इस्त्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर त्या देशाला प्रत्युत्तर देण्याची शपथ इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी घेतली होती. शत्रुचा ताबडतोब सूड घेणारे राष्ट्र अशी इस्त्रायलची इतिहासातील उदाहरणांवरून जगभरात ओळख आहे.
मात्र यावेळी इराणने हल्ला करूनही इस्त्रायल अद्याप पुरते पेटले नसून यामागे अमेरिका हे एकमात्र कारण आहे. सीरियामध्ये इराणच्या दुतावासावर हल्ला करण्याचा आणि त्यांच्या राजदुतांना मारण्याचा इस्त्रायलवर आरोप आहे. त्याचाच आधार घेत इराणने ड्रोनद्वारे हल्ला केला.
तथापि, इस्त्रायची सुरक्षा प्रणाली भक्कम असल्याने त्यांचे फार नुकसान झाले नसले तरी झळ त्यांना सोसावी लागलीच आहे. काही दिवसांपूर्वीच नेतान्याहू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची एक तातडीची बैठक बोलावली होती. त्याचवेळी इस्त्रायलने कारवाई करावी यासंदर्भात मंत्रिमंडळाचे एकमत होते. मात्र हल्ल्याची वेळ कोणती असावी याबाबत एकमत झाले नव्हते.
दरम्यान, याच बैठकीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नेतान्याहू यांना फोन केला. जर युध्द सुरू झाले तर अमेरिका त्यात सक्रिय सहभाग घेणार नाही असे त्याचवेळी बायडेन यांनी नेतान्याहू यांना स्पष्ट केले.
इस्त्रायलने शस्त्रे आणि अन्य काय लागेल ती मदत आम्ही करू. मात्र आम्ही स्वत: युध्दात उतरणार नाही असेही बायडेन यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्वाणीच्या भूमिकेमुळे नेतान्याहू यांचा जोश थंड झाला असल्याचे सांगितले जाते.
अमेरिकेने जर या संघर्षात उडी घेतली तर पश्चिम आशियातील स्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. अमेरिका कायमच इस्त्रायलच्या बाजूने उभा राहीला आहे. मात्र आता त्यांची युध्दाची इच्छा नाही असे बायडेन यांनी सांगितल्याचे समजते. केवळ अमेरिकाच नाही तर अन्य देशांनीही इस्त्रायलला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.