नवी दिल्ली – इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्ट्यामध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यात नजरचुकीमुळे संयुक्त राष्ट्राचे ७ मदतनीस ठार झाले आहेत. इस्रायलच्या लष्कर प्रमुखांनी ही चूक कबूल केली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजूतीमुळे हे ७ मदतनीस मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलचे लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल हेर्झी हालेवी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही अत्यंत गंभीर चूक होती, असे त्यांनी म्हटले आहे.
रात्रीच्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान गैरसमजूतीमुळे ही चूक झाली. ही चूक व्हायला नको होती. असे ते म्हणाले. मात्र या संदर्भातील अधिक कोणताच तपशील त्यांनी दिला नाही. ही चूक होण्यामागील कारणांचा तपास उच्चस्तरिय त्रयस्थ समितीकडून केला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्राचे ७ मदतनीस गैरसमजूतीतून मारले गेल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलवर जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाय योजना केल्या गेल्या नव्हत्या, हेच यातून सिद्ध होते.हे जे झाले, ते पुरेसे नव्हते का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ठार झालेल्या ७ मदतनीसांमध्ये अमेरिकेतील एका कार्यकर्त्याचाही समावेश होता.
भर युद्धामध्ये गरजूंना अन्न पुरवण्याचे काम हे लोक करत होते. इस्रायलची ही कृती बेजबाबदारपणाची आहे. गाझामध्ये मानवतावादी मदत यापुढेही दिली जात राहणार आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
अन्न पुरवठा करणाऱ्या सेवाभावी उपक्रमातील कार्यकर्ते
ठार झालेले संयुक्त राष्ट्राचे मदतनीस हे पॅलेस्टिनींसाठी अन्न पुरवठा करणाऱ्या वर्ल्ड सेंट्रल किचन या सेवाभावी उपक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये ब्रिटनचे ३, ऑस्ट्रेलिया, पोलंड, अमेरिका-कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व असलेला प्रत्येकी एक आणि एक पॅलेस्टाईन कार्यकर्ता होता.