जयकुमार गोरेच आमदार होणार – ना. महाजन

माण-खटावमधील उमेदवारीचा सस्पेन्स संपला; 32 गावांना पाणी देण्याच्या योजनेचे भूमिपूजन

यावेळी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित असल्याने व्यासपीठावर आणि समोर गर्दी झाली होती.
“आमचं ठरलंय’वाल्यांनी त्यांची जिरलीय, हे कबूल केल्याने एकमेकांची ढकलाढकली सुरू असल्याचे गोरे म्हणाले. विठ्ठलाच्या दर्शनाला जायला मतदारसंघातून रेल्वे पाहिजे, अशी मागणी गोरेंनी करताच खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. म्हसवड, पिंगळी औद्योगिक वसाहतींचे काम लवकरच सुरू होणार.

सातारा – देश आणि राज्य प्रगतीच्या शिखरावर नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची क्रेझ आहे. खटाव-माणचा दुष्काळ हटविण्यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन आखून कामेही सुरू केली आहेत. येत्या दोन वर्षात माणच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहे-कठापूरचे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांना टेंभूचे पाणी देणारच, असा विश्‍वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्‍त केला. माण -खटावमधून मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याप्रमाणे जयकुमार गोरेच लढतील आणि आमदारही होतील, असे सांगून त्यांनी उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवून टाकला.

कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजेनेचे पाणी आंधळी धरणातून माण तालुक्‍याच्या उत्तर भागातील 32 गावांना पाणी देण्याच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर दहीवडी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार जयकुमार गोरे, माण-खटावचे प्रभारी सदाशिव खाडे, धैर्यशील कदम, भीमराव पाटील, भाजप माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब खाडे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्प शहा, नगराध्यक्ष दिलीप जाधव, धीरज दवे, अर्जुन काळे, अरुण गोरे, अतुल जाधव, सुवर्णा साखरे, सोनिया गोरे, सुवर्णा पोरे, शिवाजीराव शिंदे, बाळासाहेब खाडे, प्रदीप शेटे, विजय साबळे, सोमनाथ भोसले, सिद्धार्थ गुंडगे, बाबासाहेब हुलगे, वडूज, दहीवडी, म्हसवडचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

ना. महाजन म्हणाले, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काश्‍मीरमधील 370 कलम हटवून एकसंध भारताची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यांनी देश आणि राज्य प्रगतिपथावर नेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळ हटणार आहे. माण-खटावमधून तिकीट कुणाला द्यायचे, ते मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. जयकुमार गोरेंचे समर्थन करणाऱ्या जनतेच्या मनात आहे, तेच घडणार आहे. जयाभाऊंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करा.

मला खासदार करताना मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेंना दिलेला शब्द आज पूर्ण झाला आहे. 32 गावांसाठी पाणीयोजना जयकुमार गोरेंनीच मांडली. त्यासाठी निधी मिळवून कामही सुरू केले. माणचा दुष्काळ हटविण्यासाठी झटणारे जयाभाऊंचे नेतृत्व राज्यस्तरावर चमकणार आहे. जयकुमार गोरेंना लाखाच्या मताधिक्‍याने निवडून आणायचे “आमचं ठरलंय’, असा टोला खा. रणजितसिंह यांनी लगावला.

जयकुमार गोरे म्हणाले, जनतेने माझ्यावर टाकलेली पाणी आणायची जबाबदारी पार पाडली आहे. उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्‍यांमधील 97 गावांमध्ये पोहोचले आहे. उत्तर माणच्या 32 आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांचा पाणीप्रश्‍न मार्गी लावून मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी ऐतिहासिक भेट दिली आहे. दोन तालुक्‍यांमधील काही वाजंत्री एकत्र येऊन जयकुमारने काय केले, असे विचारत आहेत. त्यांना मी केलेली हजारो कोटींची विकासकामे दिसत नाहीत. मी पाणी आणले म्हणून आज मतदारसंघात साखर कारखाने दिसत आहेत. एका “टेंडऱ्या’ने उत्तर माणची योजना मंजूर असेल तर जयकुमारच्या घरी चाकरी करेन, असे जाहीर केले होते. आता माझ्या प्रयत्नांमुळे या योजनेला मुख्यमंत्र्यांनी विक्रमी वेळेत सुधारीत प्रशासकीय मान्यता आणि 284 कोटींचा निधीही दिला आहे. आता त्याने माझी घरी चाकरी करावी. टेंभूचे पाणी खटाव-माणमधील 32 गावांना देण्यासाठी पाण्याचे फेरवाटप होत आहे. सदाशिव खाडे, शिवाजीराव शिंदे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.