नवी दिल्ली : कॉंग्रेसने आपल्या नव्या डिजीटल स्टाईलने केंद्रातील सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढग आणि रडारच्या विधानापासून ते खासदार सत्यपाल सिंग यांच्या डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतापर्यंत भाजपा नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे. गाजलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर कॉंग्रेसने डिजिटल स्वरूपात ‘बंच ऑफ थॉट्स’ असा व्हिडीओ तयार केला आहे.
Bunch of Thoughts: BJP edition
Foreword: When the country’s leaders defy logic we should all be afraid. pic.twitter.com/PuoXKO903W— Congress (@INCIndia) September 16, 2019
ज्यावेळी देशाचे नेते तर्कशास्त्र नाकारतात, त्यावेळी आपल्या सर्वांना याची भीती वाटली पाहिजे, असे मतही कॉंग्रेसने व्यक्त केले आहे. मोदी सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने सोशल मीडियातूनही आक्रमक झाली आहे. भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या अतार्किक वक्तव्यांवरून कॉंग्रेसने भाजपावर व्यंगात्मक टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अर्थमंत्री निर्मला सीतारामण, रेल्वेमंत्री पियूष गोयल, सत्यपाल सिंग, त्रिवेंद्र सिंग, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, सुशीलकुमार मोदी आदीं नेत्यांनी केलेल्या विधानांवर कॉंग्रेसने व्हिडीओ स्वरूपात पुस्तक तयार केले आहे. या व्हिडीओला ‘बंच ऑफ थॉट्स : बीजेपी एडिशन’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी देशाचे नेते तर्कशास्त्र नाकारतात, त्यावेळी आपल्या सर्वांना याची भीती वाटली पाहिजे,असे मत कॉंग्रेसने व्यक्त केले आहे.