किवळे, {उमेश ओव्हाळ} – उन्हाचा तडाखा वाढल्याने नदी आणि बंधाऱ्यांवर पोहायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २२ आणि २४ एप्रिल रोजी दोन ठिकाणी १७ वर्षीय युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे पुरेशी काळजी घेतल्याशिवाय पाण्यात उतरू नका, असे आवाहन पोलिसांनी कले आहे.
एनडीएची परिक्षा देण्यासाठी पुण्यात आलेला माधव हरगौरी सिंग (वय १७, रा. नाशिक) हा युवक २२ एप्रिल रोजी कासारसाई येथील धरणावर पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अगदी दोनच दिवसांनी म्हणजे २४ एप्रिल रोजी किवळे येथील महादेव घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या तुषार नरेश जाधव (वय १७, रा. लांडेवाडी, भोसरी) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशाच प्रकारची घटना बोपखेल येथे घडली आहे. मात्र पाण्यात बुडालेल्या त्या तरुणाचा शोध लागलेला नाही.
शाळेला सुट्ट्या लागल्याने लहान मुले आपल्या किंवा मामाच्या गावी आली आहेत. तसेच यात्रांचा हंगाम सुरु झाल्याने पाहुणे मंडळी आणि त्यांची मुले गावात दाखल झाली आहेत. गावाकडे कडक उन्हाळा असल्याने दुपारच्यावेळी अनेकजण पोहण्याचा आनंद घेत असतात. कोणी स्वतःच्या कुटुंबासोबत तर कोणी मित्र परिवारासमवेत नदी, तलाव, धरण आणि विहिरींवर पोहायला जातात. परंतु, पुरेशा काळजी आणि दक्षतेअभावी क्षणाचा आनंद जीवावरही बेतण्याची शक्यता असते.
अचानक वाढते नदीतील पाणी
पवना नदीत पोहण्यासाठी गेलेले तरुण सांगतात की नदीला एवढे पाणी नव्हते मात्र अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पवना धरणातून दुपारच्यावेळेस पाणी सोडले जाते. अशवेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. काही ठिकाणी पवना नदीच्या आसपास मदतीला येण्यासाठीही कोणी नसते.
यामुळे होतो अपघात
काही भागांत नदीपात्रात दिसून न येणाऱ्या झाडांच्या बुंध्यामुळे किंवा खडकांमुळे पाण्याचे भोवरे निर्माण झाले आहेत. या भोवऱ्यात पट्टीचा पोहणारा गेला, तरी त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मोठ-मोठे शेवाळ वाढल्याने त्यामध्ये अडकण्याची शक्यता असते. तसेच नदीपात्रात खड्डे असल्याने तेथे माणूस बुडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, अशा ठिकाणच्या नदीपात्रात जाण्याचा मोह टाळावा,
सूचना फलकांकडे दुर्लक्ष
धरण आणि नदीवर काही ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक प्रशासनाने लावले आहेत. त्या फलकांकडे दुर्लक्ष करून काहीजण धोका पत्करतात. असे धाडस करणारे अनेकजण जिवाला मुकले आहेत. तर काहीजण रिल्स काढण्यासाठी पूल किंवा उंचावरून उडी मारण्याचा स्टंट करतात.
काय करायला हवे
■ धोकादायक ठिकाणी पोहायला जाणे टाळावे
■ पोहायला जायचेच असेल तर सुरक्षा साधनेबरोबर ठेवा
■ पोहता येणाऱ्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमवेत रहावे
■ प्रथमोपचाराचे ज्ञान असल्यास अधिक चांगले