Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अल्शिपोरा, शोपियानमध्ये ही चकमक झाली आहे. दरम्यान, याच ठिकाणच्या जवळपासच्या जंगलात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम राबवली जात असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली.
जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यापूर्वी 4 ऑक्टोबरलाही सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी कुलगामचे रहिवासी होते. चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांचीही ओळख पटली आहे. मोरीफत मकबूल आणि जाजीम फारुक उर्फ अबरार अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत जाजीम फारुख उर्फ अबरारचाही हात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याआधी सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. बासित अमीन भट आणि साकिब अहमद लोन अशी या दहशतवाद्यांची ओळख असून दोघेही कुलगामचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या कुज्जरमध्ये दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली आणि त्यांना घेरले तेव्हा या दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. यानंतर हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी मारले गेले, त्यांचे मृतदेहही सापडले. घटनास्थळावरुन आक्षेपार्ह कागदपत्रे, शस्त्रे, काडतुसे आणि एके-47 मालिकेच्या दोन रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.