पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) – भंडारा डोंगराला भेदून जाणाऱ्या रिंगरोडमध्ये बदल केल्याबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे, विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार मानले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना भंडारा डोंगराला भेट देण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही भेट देण्याची ग्वाही दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे जागतिक कीर्तीचे भव्य मंदिर साकारले जात आहे. तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे शिल्प उभारले जाणार असून मंदिराचे काम वेगात सुरू आहे. मंदिराच्या कामाची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला 110 मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून जात होता. डोंगराला बोगदा करण्यास वारकरी व संस्थानचा विरोध होता. वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेता भंडारा डोंगराला भेदून जाणाऱ्या रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची मागणी खासदार बारणे यांनी राज्य सरकारकडे केली होती.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रिंगरोड भंडारा डोंगराच्या बाजूने घेण्याचा निर्णय घेतला.
देवस्थानच्या वतीने जन्मोत्सवाचे निमंत्रण
जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त (वसंत पंचमी) श्रीराम कथा वाचक मुरारी बापू यांचे 21 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 दरम्यान संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरामध्ये श्रीराम कथा वाचन होणार आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संस्थानच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे. खासदार श्रीरंग बारणे, देहू संस्थानचे अध्यक्ष हभप नितिन महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख हभप संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विश्वस्त संतोष महाराज मोरे, शिवसेना देहू शहरप्रमुख सुनील हगवणे आदी यावेळी उपस्थित होते.